Vakatakkalin Vidarbh
प्राचीन भारताच्या ऐतिहासिक कालखंडाचा विचार केल्यास उत्तरेत इसवी सन पूर्व ३०० च्या दरम्यान चंद्रगुप्त मौर्याने प्रथमत: केंद्रशासीत राज्यव्यवस्था निर्माण केली. सम्राट अशोकाच्या सोपारा स्तंभलेखावरून दक्षिणेत मौर्य साम्राज्याच्या सीमा म्हैसूरपर्यंत विस्तारलेल्या असल्याचे स्पष्ट होते. सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्विकारल्यानंतर धर्म प्रचारार्थ पाठविलेल्या स्ववीरांच्या नोंदी पाचव्या व तेराव्या शिलासनात आहेत. त्यात असलेले भोज, पेतनिक, रठिक, अपरांत इत्यादी उल्लेख; दक्षिण पंथाशी संबंधीत आहेत. त्यातील भोज राज्य म्हणजे ‘विदर्भ’ होय.
प्राचीन विदर्भाच्या इतिहासात वाकाटकांचा काळ हा सुवर्णाक्षरांनी लिहावा लागेल असा हा कालखंड आहे. ‘वाकाटक’ घराण्याचा शासनकाळ साधारणत: इसवी सन २५० ते ५५० मानला जातो. या तीनशे वर्षाच्या काळात विदर्भाला वाकाटकांनी समृद्धी आणली. वाकाटक राजे पराक्रमी व ऐश्वर्यसंपन्न होते. तसेच ते प्रजाहितदक्ष, धर्मसहिष्णू, कला व स्थापत्याचे भोक्ते होते. हा कालखंड; राजकीयदृष्ट्या समृद्ध व आपला ठसा उमटविणारा कालखंड होता. विदर्भाला वाकाटक घराण्याच्या विविध राजांनी वैभव प्राप्त करून दिले. वाकाटकांच्या प्रबळ सत्तेने उत्तर आणि दक्षिण भारतावरही प्रभाव टाकला.
अशा या प्राचीन भारतीय इतिहासातील या काहीशा दुर्लक्षित परंतु महत्वाच्या कालखंडाची ओळख करून देणारे हे पुस्तक जिज्ञासू वाचकांबरोबर इतिहास अभ्यासकही अवश्य पसंत करतील असा विश्वास वाटतो.
✻