Nizam-Peshwe Sambandh
व्याख्यानांचा विषय ‘निजाम-पेशवे संबंध’ असा असून त्यांत पेशवाईतील मराठ्यांच्या इतिहासाचा एक उभा छेद देण्यात आलेला आहे. शिवछत्रपतींनी मराठ्यांचे स्वतंत्र्य राज्य या खंडप्राय देशातील हिंदु-मुसलमानांचा शतकानुशतक चालत आलेला कठीण प्रश्न सोडविण्यासाठी स्थापिलें. त्यांनी घालून दिलेली पद्धति त्यांच्यानंतर पुरी एक पिढी तशीच चालु राहिली. पण नंतर तिला उलटी कलाटणी मिळून स्वतंत्र राज्याचें साम्राज्यांतर्गत स्वराज्यांत रूपांतर झाले. त्याचा परिणाम दक्षिणेंत त्या मोगल साम्राज्याचा प्रतिनिधि जो निजाम तो कायम होण्यात झाला. हा इतिहास या सहा व्याख्यानांत मांडण्यांत आला आहे. ही गोष्ट राजवाड्यांनी अर्धशतकामागेच आपल्या दुसऱ्या खंडाच्या प्रस्तावनेंत स्पष्टपणे मांडली होती, पण याच सुमारास आलेल्या देशभक्तीच्या पुरांत हा खरा इतिहास दृष्टीआड झाला व महाराष्ट्रांत अशी चुकीची समजूत दृढ झाली की पेशव्यांचे राज्य सार्वभौम होते. प्रसिद्ध व अप्रसिद्ध हजारों मराठी अस्सल पत्रांच्या आधारानें हें मत कसें चुकीचें आहे हें या व्याख्यानांत साधार दाखविण्यांत आलेलें आहे.
प्रा. त्र्यं. शं. शेजवलकर
✻