Prachin Bouddh Rajkiya Vicchar
जागतिक राजकीय विचारांच्या इतिहासामध्ये भारतीय राजकीय विचार परंपरेचे स्थान अनन्यसाधारण आहे. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, बौद्ध व जैन या भारतीय राजकीय विचारांच्या प्रमुख शाखा आहेत. धर्माच्या अनुषंगाने झालेला विकास हे या परंपरेचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये आहे व हे राजकीय विचार विविध धर्मग्रंथांमध्ये विस्कळीत व विखुरलेल्या स्वरुपात आढळतात. बौद्ध राजकीय विचारांनी भारतीय राज्यशास्त्रास समृद्ध केले आहे पण काही अंशी हे विचार दुर्लक्षित राहिले आहेत. ‘नैतिकता’ व ‘सदाचार’ हे बौद्ध राजकीय विचारांचे महत्त्वाचे वैशिष्ठेय आहे. राज्यसंस्था : निर्मिती व स्वरूप, लोकशाही गणराज्य व राजेशाही शासनपद्धती, आंतरराष्ट्रीय राजकारण, हिंसाजन्य युद्ध, शांतता व सामंजस्य, राज्य विकासाचे सर्वसमावेशक प्रतिमान, शासनकर्त्यांची भूमिका व कर्तव्ये इत्यादींबाबतची अत्यंत महत्त्वाची मांडणी बौद्ध राजकीय विचारांमध्ये करण्यात आलेली आहे. धर्म आणि राज्यसंस्था यांच्यातील संघर्षाच्यावेळी बौद्ध राजकीय विचार हा नैतिकता व सदाचार याचे समर्थन करतो.
तथागत गौतम बुद्धांचे धम्म तत्वज्ञान हे सत्य, अहिंसा, नैतिकता, सदाचार इत्यादी आदर्शवादी तत्त्वांवर आधारलेले आहे व तो त्याचा मुलभूत गाभा आहे. याउलट राज्यसंस्था अथवा दंडसंस्थेचे स्वरूप आहे. राजकीय हिंसा, अपराध्यास व गुन्हेगारास शारीरिक, मानसिक व आर्थिक दंडात्मक शिक्षा, राजकीय डावपेचांच्या यशस्वीतेसाठी प्रसंगी असत्य व कठोर बोलणे इत्यादींबाबी ह्या राज्यसंस्थेचा स्थायीभाव आहे.
या राजकीय द्वंद्वातून बाहेर पडण्याचे मार्गदर्शनपर उपायसुद्धा तथागतांनी सांगितले होते. या राजकीय द्वैताची मांडणी व ते सोडविण्याचे बुद्धांनी सांगितलेली उपाय याबाबत या पुस्तकामध्ये मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे.
✻