Adhunik Rajkiya Vishleshan Kosh

Marathi
0
9788184835441
डॉ. विजय देव यांच्या ‘आधुनिक राजकीय विश्‍लेषण कोश’ या ग्रंथाने मराठीतील कोशवाङ्मयात मोलाची भर घातली आहे. सामाजिक शास्त्राचे विद्यार्थी, अध्यापक, संशोधक, वृत्तपत्रकार, स्पर्धा परीक्षांचे उमेदवार, सामाजिक शास्त्रांतील पाठ्यपुस्तके लिहिणारे शिक्षक, तसेच सामान्य जिज्ञासू वाचक या सर्वांना या कोशाचा उपयोग होऊ शकेल. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी सामाजिक विषयांना कला म्हणावे की शास्त्र, असा प्रश्न पूर्वी नेहमी उपस्थित केला जात असे; परंतु आता या विषयांचा अभ्यास विश्‍लेषणात्मक पद्धतीने होऊ लागल्यामुळे, तसेच अलीकडे ‘आधुनिक राजकीय विश्‍लेषण कोश’ यांसारखी पुस्तके प्रसिद्ध होऊ लागल्यामुळे हे विषय ‘शास्त्र’ किंवा ‘विज्ञान’ या पदापर्यंत पोहोचू लागले आहेत. एखादा विषय विश्‍लेषणात्मक पद्धतीने अभ्यासला जाऊ लागला की, त्याला विज्ञानाचा दर्जा प्राप्त होऊ लागतो. प्रस्तुत संदर्भग्रंथात सुमारे चारशे संकल्पनांच्या नोंदी स्पष्ट केल्या आहेत. राज्यशास्त्राच्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना राजकीय विश्‍लेषण, राजकीय समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास करण्यासाठी या ग्रंथाचा विशेष उपयोग व्हावा, असा हेतू मनात ठेवूनच ग्रंथरचना केलेली आहे. तरीसुद्धा वर म्हटल्याप्रमाणे निरनिराळ्या सामाजिक क्षेत्रांत काम करणार्‍या जिज्ञासूंनादेखील या ग्रंथाचा निश्‍चितच उपयोग आहे. राजकीय विश्‍लेषक किंवा राजकीय समाजशास्त्राचे अध्यापक या विषयातील सुमारे शंभर संकल्पनांचाच वापर करताना आढळतात. त्यांनी हा विषय चहूअंगांनी शिकवावयाचा म्हटल्यास, निदान तीनशे संकल्पनांचा वापर करावयास हवा. त्यासाठीही ‘आधुनिक राजकीय विश्‍लेषण’ हा विषय शिकविणार्‍या प्राध्यापकांना हा कोश उपयुक्त ठरावा!