Shivcharitra Sahitya (khand 15)
Marathi
अस्सल कागदपत्रांच्या साहाय्याव्यतिरिक्त ह्या बखरीं वाचूं गेले असतां एक प्रकारची चमत्कारिक चूक होते. ह्या बखरींतून जो मजकूर खरा असतो तो त्यांत असलेल्या खोट्या मजकुरापासून विलग काढून घेतां येत नाही. सारांश, केवळ ह्या बखरींवर भिस्त ठेवून इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केल्यास, सत्यासत्यतेच्या निर्णयाची कसोटी जवळ नसल्यामुळें, तो वायफळ जाण्याची बहुतेक खात्री आहे. पुष्कळ बखरींतून एकच मजकूर एकसारिखा आल्यास, बहुमताच्या न्यायानें, तो खरा मानण्याचीहि ह्या बखरींच्या संबंधाने सोय नाही. पुष्कळ ऐतिहासिक गोष्टींच्या अभावाचें साधारणत्व ह्या बखरींतून सांपडतें; परंतु, तेवढ्यावरून त्या गोष्टी झाल्याच नाहीत असे विधान करणे मोठे धोक्याचें काम होईल. तात्पर्य, एक अस्सल चिटोरें सर्व बखरींच्या बहुमताला हाणून पाडण्यास बस्स आहे.... कांकी विश्वासार्ह अस्सल कागदाच्या एका चिटोर्यावर जितका विश्वास ठेवितां येतो तितका स्वदेशीय व विदेशीय बखरकारांच्या व बखरवजा इतिहासांच्या भाकड कथांवरती अर्थात् ठेवितां येत नाही.
✻