Rajanchya Katha
अनेक राजांनी आदर्शांचे हिमालय उभे केलेले आहेत. महान उदाहरणे जगापुढे ठेवलेली आहेत. सर्वभक्षक काळही त्यांची नावे पुसू शकला नाही. विस्मृतीच्या वाळवंटातही त्यांची न पुसली जाणारी पावले उमटलेली आहेत. लोकशाहीतील नेत्यांनीही त्यांचा अभ्यास, गुणानुकरण करावे असे हे महान नृपती आहेत. अशा राजांच्या गुणांचे संस्कार नवीन पिढीवर अवश्यमेव झाले पाहिजेत, नवीन पिढीला आणि सर्वांनाच त्यांची माहिती झाली पाहिजे. राजा याचा अर्थ इथे राष्ट्रनेता असा करूया. राजा असो वा राष्ट्राध्यक्ष वा पंतप्रधान - रक्षण आणि पोषण ही त्यांची आद्य कर्तव्ये होत. तसेच पुलंच्या भाषेत शीत (अन्न), सूत (वस्त्र), आणि छत (निवारा) या किमान गोष्टी त्याने जनतेला पुरवल्याच पाहिजेत. म्हणूनच संस्कृतमध्ये म्हटलेले आहे, ‘राजा प्रकृतिरंजनात्’ जो प्रजेचे रंजन करतो तोच राजा. पाचही गरजा पूर्ण झाल्या तरच रंजन होणार हे खरेच आहे. तर या पाचही गरजा (अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, वैद्यकीय साहाय्य) पूर्ण करून काही राजांनी जनतेला आणखीही खूप काही दिले आहे, अशा काही अज्ञात, अल्पज्ञात, उपेक्षित नि प्रसिद्धही अशा राजांचा हा कालपट आपल्यापुढे उलगडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न !
✻